कला क्षेत्रातील महिला कलाकारांचा सन्मान सोहळा

पुणे – जागतिक महिला दिन आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरुड शाखा व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने कला क्षेत्रातील महिला कलाकारांचा सन्मान सोहळा करण्यात आला.
रविवारी (दि. १६ मार्च) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे शिला देशपांडे (सांगितिक कार्यक्रम आयोजिका), वर्षा जोगळेकर (संगीत नाट्य कलाकार व व्यवस्थापन), अस्मिता चिंचाळकर (संगीत नाट्य अभिनय), राधिका अत्रे (गायन कला), शुभांगी दामले (प्रायोगिक रंगभूमी),
रत्ना दहिवेलकर (निवेदन), अश्विनी थोरात (अभिनय), नीता दोंदे (अभिनय) साधना विसाळ (श्री स्वामी समर्थ केटरर्स, पडद्यामागील कलाकार), यांचा देवकी पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते मानपत्र, साडी आणि पुस्तक (बुके ऐवजी बुक या उपक्रमात) देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या देवकी सुतार म्हणाल्या की, ‘महिला दिनांचे औचित्य साधून कला क्षेत्रातील महिलांचा सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानते. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी कलाकारांचा मोलाचा वाटा असतो. असे मत मांडून सर्व सन्मानर्थीचे अभिनंदन केले.
सन्मानार्थी महिलांतर्फे शुभांगी दामले यांनी आयोजकांचे आभार मानताना म्हणाल्या की, ‘जिथं महिलांचा सन्मान केला जातो तिथं देवाचं वास्तव्य असतं. अश्या सन्मानाने आम्हाला आनंदायी वाटतं. पुढील कामासाठी प्रोत्साहन मिळतं.’
कार्यक्रमाचे आयोजन कोथरुड नाट्य परिषदेचे सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी, दिपक गुप्ते, दिपक पवार, गिरीष गोडबोले आणि इतर पदाधिकारी व सभासद यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करताना सत्यजित धांडेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. तसेच उपस्थितांचे देखील आभार मानून कोथरूड नाट्य परिषद वर्षभर असेच कार्यक्रमांचे आयोजन करत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रौप्य महोत्सव वर्ष साजरे करणार आहोत.
सत्कार समारंभ झाल्यानंतर उपस्थितांसाठी ‘चांदण्यात फिरताना’ या सुरेल गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना धनंजय पूरकर यांची होती. यामध्ये
गायक गफार मोमिन तसेच गायिका राधिका अत्रे, भाग्यश्री डुंभरे यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. मानसी आरकडी यांनी केले.