नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे सुकन्या कुलकर्णी-मोने आणि संजय मोने यांचा यशवंत-वेणू पुरस्काराने गौरव

0
नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे सुकन्या कुलकर्णी-मोने आणि संजय मोने यांचा यशवंत-वेणू पुरस्काराने गौरव

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा २४वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे, ता. २६: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत-वेणू पुरस्काराने अभिनेते संजय मोने आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांचा सोमवारी (दि. २५) गौरव करण्यात आला.

स्व. यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा २४वा वर्धापन दिन यानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे ७वे वर्ष असून पुरस्कार वितरण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी, उद्योजक अमित गोखले, दीपक गुप्ते, मदन गायधने मंचावर होते. मानपत्र, शाल आणि पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.

त्या वेळी सुकन्या कुलकर्णी-मोने आणि संजय मोने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘पत्नीच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा जोडीदार मिळाल्यास पत्नीलाही तिच्या कार्यक्षेत्रात यश मिळू शकते हे संजय मोने यांनी सिद्ध केले आहे. आमची वाटचाल समांतर होत असताना प्रगतीही होत गेली. यशवंत-वेणू पुरस्कार मिळाल्याने नाट्य-कला क्षेत्रात, रंगमंचावर पुन्हा एकदा कार्यरत होण्याची उभारी निर्माण झाली आहे. माणूस म्हणून प्रिय असलेल्या लाडक्या सुहासताईंच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे.’ अशी भावना सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी व्यक्त केली. तर
‘माझा परिचय करून देताना सांगितलेले गुणांचे कोठार माझ्यात नाही, पण हे गुण भविष्यात माझ्यात नक्की येतील.’ अशी मिश्लिक टिप्पणी संजय मोने यांनी व्यक्त करत ‘पत्नीमुळे मला हा पुरस्कार मिळाल्याचे कबुल करत सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पण भावनिक नात्याने बांधल्या गेलेल्या दाम्पत्याचा यशवंत-वेणू पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. पुरस्काराविषयी आभार व्यक्त करून नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

सुहास जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी सुहास जोशी म्हणाल्या, माझा जन्म आणि जडणघडण पुण्यात झाल्यामुळे मला पुण्याविषयी विशेष ममत्त्व आहे. पुण्यात येताना अनेक वास्तू पाहून मला जुने दिवस आठवले. माहेरी आल्याचा ‘फील’ आला. पुरस्कार्थी सुकन्या आणि संजय हे मला मुलांसारखे आहेत. असे सांगत त्यांनी एकत्र काम केलेल्या नाटक-मालिकांमधील आठवणी जाग्या केल्या.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘तो राजहंस एक‌’ या संगीतकार श्रीनिवास खळे संगीत रजनी कार्यक्रमात मंदार आपटे आणि मनिषा निश्चल यांनी गीते सादर केली. स्मिता गवाणकर यांनी निवेदन केले.

मान्यवरांचे स्वागत सुनील महाजन, अमित गोखले, सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते यांनी केले. सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले. सत्यजित धांडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed