पुणेकरांच्या प्रश्नांसाठी पुणेकरांना मिळाले हक्काचे व्यासपीठ; ‘वेध अस्वस्थ मनाचा’ परिसंवादात समस्यांवर चर्चा

पुणे पुन्हा सु-संस्कृत करण्यासाठी पुणेकरांच्या चांगल्या शक्तीचे एकत्रीकरण महत्त्वाचे
पुणे – ‘वेध अस्वस्थ मनाचा-आवाज महाराष्ट्राचा, आवाज सर्वसामान्य माणसाचा’ या परिसंवादाचे आयोजन पराग ठाकूर, शिरीष मोहिते, उदय जगताप आणि पुणेकर नागरिक यांच्या वतीने टिळक रस्त्यावरील स्वारगेट जवळील डॉ. नीतू मांडके सभागृह येथे करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ राजकीय नेते माधव भंडारी, माजी महापौर अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, व्याख्याते गणेश शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
पूर्वीच्या सुसंस्कृत पुण्याची ओळख दिवसेंदिवस बदलत चालली आहे. याचं मुख्य कारण काही काळ पुण्यात राहायला आलेली माणसं. जी पुण्याला आपलं कधी मानतच नाही. असे मत अंकुश काकडे यांनी मांडले.
यावेळी माधव भंडारी म्हणाले कि,
‘प्रत्येक राजकीय पक्षात वाचाळवीर वाढले आहेत. याला कारण पक्षाच्या नेत्यांचा त्यांच्यावर असलेला वचक संपला आहे. ‘पक्षाचा नेता असो किंवा कार्यकर्ता त्यांनी भान सोडून बोलू नये. त्यामुळे राजकीय अनास्था वाढत आहे. वाढती गुन्हेगारी, अमली आणि मादक पदाघांची सरांस विक्री, हे पुण्यासामोरील महत्वाचे प्रश्न आहेत. या विरोधात लढा देण्याची गरज आहे. त्याकरिता शैक्षणिक संस्था व सर्व विद्यापीठ यांच्या प्रमुखांना एकत्र आणले पाहिजे, त्यातूनच मार्ग निघेल.’
गिल म्हणाले, ‘लहान मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. शालेय मुलांच्या दप्तरात कोयते व धारदार शस्त्रे सापडतात. पुणेकर पालक म्हणून काही ठिकाणी कमी पडत आहेत. आपल्या पाल्यावर पालकांचे लक्ष असणे फारच जरुरी आहे. त्याचा मित्र परिवार कोण आहे हे पालक म्हणून आपल्याला माहित पाहिजे. तसेच अधून मधून पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी करायला हवी.’
सुर्यकांत पाठक म्हणाले कि, पुण्याचा ऱ्हास व्हायला बाहेरून आलेली मांडली कारणीभूत आहेत. पोलिसांचा धाक कमी झाला आहे, असे वाटत आहे. त्यामुळेच रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर गर्दी वाढत चालली आहे. यातूनच गुन्हेगारी वाढत आहे. सज्जनशक्तीच्या एकत्रीकरणाने पुन्हा बदल घडू शकतो,
यावेळी गणेश शिंदे म्हणाले कि, अर्धवट माहिती घेऊन कोणीही महापुरुषांबद्दल काहीही बोलावे याची जणू चढोओढच लागली आहे. त्याची आपण सामुहिक दखल घेतली पाहिजे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून मोहिते म्हणाले कि, सर्वच क्षेत्रांतील वाईट परिस्थिती बदलण्याकरिता पुणेकरांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपण तो घडवून आणू. हाच आजच्या ‘वेध अस्वस्थ मनाचा’ या परिसंवाद घडवून आणण्याचे प्रमुख कारण आहे.