एकता मित्र मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!पुणे जिल्हा उत्कृष्ट मंडळ प्रथम क्रमांक मानकरी…!

पुणे ता. 11 : अभिमानाचा अविस्मरणीय सुवर्ण क्षण,सांस्कृतिक कार्य विभाग,पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ मध्ये आपल्या अरण्येश्वर, तावरे कॉलनी येथील एकता मित्र मंडळाला महाराष्ट्र राज्य शासनाकडून “पुणे जिल्हा उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम क्रमांक” पुरस्कार ९ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळा यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव (सांस्कृतिक कार्य विभाग) विकास खारगे व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विकास खारगे यांनी माहिती देताना सांगितले की, या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ११०० गणेश मंडळे सहभागी झाली होती. त्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्कृष्ट मंडळ निवडणे हे परीक्षकांसाठी खूप मोठी जबाबदारी होती. पण अत्यंत योग्य परीक्षण करून हिरे निवडून काढावेत अशी अत्यंत कार्यक्षम, आदर्श आणि समाजासाठी काम करणारी मंडळे मुंबई पर्यंत पोहोचविली. हातून झालेल्या कार्याचे चीज झाले असे म्हणत एकता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार मानले. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले यांनी दिली.