‘पर्वती’ करांना मंत्रीपदाची ओढ

यंदा तरी पर्वती मतदारसंघात मंत्री पद मिळावे नागरिकांची भावना-
बिबवेवाडी, ता, २६ : पर्वती मतदार संघात विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा मताधिक्याने निवडून आलेल्या आमदार माधुरी मिसाळ यांना यंदा तरी मंत्री पद मिळावे. अशी अपेक्षा पर्वती मधील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
२००९,२०१४ व २०१९ मध्ये चांगल्या मताधिक्याने माधुरी मिसाळ आमदार म्हणून निवडून आल्या. यावेळीही पन्नास हजार पेक्षा जास्त फरकाच्या मताने ‘पर्वती’ करांनी त्यांना निवडून दिले आहे.
पश्चिम महाराष्ट्र मधून निवडून आलेल्या आमदारांपैकी त्या एकमेव ‘महिला’ आमदार आहेत.
यापूर्वी अनेकवेळा निवडून येऊन सुध्दा मिसाळ यांना मंत्री पदापासून पक्षाअंतर्गत निर्णयामुळे वंचित राहावे लागले असल्याची सल पर्वती मतदार संघातील नागरिकांमध्ये आहे.
भाजप सत्तेत असतानाही महिला आमदार म्हणून त्यांना मंत्री पदाची हुलकावणी मिळाली.
मतदार संघात अनेक कामे रखडलेली असून विकासाला चालना मिळणे गरजेचे आहे. गंगाधाम चौकातील वाहतूक कोंडी सोडविणे, वैद्यकीय प्रकल्प, परिसरातील झोपडपट्टी विकास, पूरग्रस्त चाळीतील घरांचा मालकी हक्क, हिल टॉप हिल स्लोप झोन बाबत निर्णय, भुसार बाजातील व्यापाऱ्यांचे सरकार दरबारी असणाऱ्या समस्या असे अनेक प्रश्न प्रलंबित असून, योजना पूर्ण होण्यासाठी तसेच सरकारी लाल फितीत अडकलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी राजकीय बळ मिळणे गरजेचे आहे. अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांची आहे.
पर्वती मतदार संघात भाजप पक्षाचे २३ नगरसेवक असून पक्षाचे बळ मोठे आहे. २८ पैकी २३ नगरसेवक असलेल्या भाजप पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ मागील तिन टर्म पासून मतदारसंघात आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत.
माधुरी मिसाळ यांची राजकीय कारकीर्द पाहता हा प्रवास करताना पक्षसंघटनेच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पक्षाच्या हितासाठी पार पाडल्या आहेत.
मात्र सध्या कोथरूडचे आमदार व माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानंतर मंत्री पदासाठी महिला व ज्येष्ठ चेहरा म्हणून माधुरी मिसाळ यांचाच विचार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पर्वती मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी यंदा तरी मंत्री पद मिळावे. अशीच भावना भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.