रामटेकडीत बंद घराला शॉर्ट सर्किट मुळे आग; संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक

पुणे, ता. १४ : रामटेकडीत शांतीनगर झोपडपट्टीत प्रथमा इमारतीच्या मागील बाजूस, दाट लोकवस्तीत बंद असलेल्या घराला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
शांतीनगर येथे राहणाऱ्या अण्णा चतुर्भुज शिंदे यांच्या घरात ही घटना घडली. ही आग एवढी मोठी होती की घरातील सर्वच संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे शिंदे यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या आगीत घरातील सर्व महत्त्वाचे कागदपत्रे, कपडे, सर्व संसार उपयोगी साहित्य, टीव्ही, सिलिंग, फॅन, बल्ब, टुब, संपूर्ण विजेचे वायरिंग तसेच रोख रक्कम जळून खाक झाली आहे. शिंदे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.
घटनेच्या वेळी घरामध्ये कुणीही नव्हते. त्यामुळे आगीने घरातील पूर्ण सामान जळाले. घरी कुणीच नसल्यामुळे सुदैवाने जिवीतहानी झाली.
शिंदे यांचा परिवार तुळजापूर या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी गेला होता. शिंदे मात्र कामावर गेले होते, त्यांना फोन वरून शेजारच्यांनी माहिती देताच ताबडतोब ते घरी आले परंतु तो पर्यंत शिंदे यांचा पूर्ण संसार आगीत जळून खाक झाला होता.
घराला आग लागलेली पाहून तरुण मुलांनी व स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाची गाडी, वानवडी पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी, व महावितरण चे कर्मचारी तसेच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले व घराला लागलेली आग विझविण्यात आली.
लोकप्रतिनिधीनी नुकसान ग्रस्त कुटुंबास त्वरित आर्थिक मदत मिळवून दयावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
“शिंदे यांनी आयुष्यभर कष्ट करून छोटेसे पत्र्याचे घर बांधले होते, त्यांच्यावर खूप मोठे आर्थिक संकट आलेले आहे, तरी शासन प्रशासनाने ताबडतोब शिंदे यांना आर्थिक मदत तसेच पुनर्वसन करावे.”
दत्ता कांबळे
संघटक – महाराष्ट्र राज्य
झोपडपट्टी सुरक्षा दल