पुण्यातील अकरा गणेश मंडळांच्या सहभागाने श्री गणेशाला पाच हजार पुस्तकांचा नैवेद्य

महाराष्ट्र जागृती
पुणे ता. 23 : जय गणेश व्यासपीठातील अकरा गणेश मंडळांच्या वतीने श्री गणेशाला ‘पुस्तकांचा नैवेद्य’ दाखविण्यात आला.
यामध्ये एकता मित्र मंडळ- अरण्येश्वर, श्री शनी मारुती मंडळ, नवज्योत मित्र मंडळ- येरवडा, नवरंग मित्र मंडळ- गाडीतळ, हडपसर, अजिंक्य मित्र मंडळ- मॉडेल कॉलनी, श्री शिवाजी मित्र मंडळ- भवानी पेठ, अष्टविनायक मित्र मंडळ- येरवडा, वीर शिवराज मित्र मंडळ- गुरुवार पेठ, अष्टविनायक मित्र मंडळ- नवी पेठ, संयुक्त मित्र मंडळ- सदाशिव पेठ व साईनाथ मंडळ ट्रस्ट- बुधवार पेठ या अकरा मंडळांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
नारायण पेठेतील एसएनडीटी कन्याशाळेच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे यांनी साकारलेल्या भव्य रांगोळी भोवती पाच हजार पुस्तकांची आरास करण्यात आली होती.
या कार्यक्रमास बालकुमार साहित्य परिषदेचे अध्यक्ष माधव राजगुरू, अनुबंध प्रकाशनचे संचालक अनिल कुलकर्णी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या कार्यकत्यांनी गोळा केलेली सदर पुस्तके ग्रामीण भागातील तसेच आदिवासी वस्तीवरील शाळांमध्ये, संस्कारवर्गात आणि वस्ती पातळीवरील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. मंडळांचा हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असून मुलांना ही पुस्तके आयुष्याच्या वाटचालीत संकटकाळात लढायला शिकवतील. मुलांनी पुस्तकांसोबत अवश्य मैत्री करावी. काही प्रेरणादायी पुस्तके यशस्वी होण्यास मार्गदर्शन करतील. असे राजगुरू यावेळी म्हणाले.